Friday, January 20, 2012

उत्तरार्ध

योगायोग म्हणा कि उत्तरायण सुरु झाले कि दरवर्षी माझ्या उत्तरार्धाला सुरवात होते. आज वाढदिवसाच्या दिवशी मला उत्तरार्ध सुरु झाल्याचा आभास होतो आहे. वयाची बत्तीशी संध्यांना, संकटांना, जबाबदारीला वा अनेक वेग वेगळ्या गोष्टींना बत्तीशी दाखवतच गेली. कदाचित म्हणून आज जरा गंभीर झालो आहे, निदान हा लेख लिहिताना तरी. असे समजू नका मला 32 व्या वर्षीच अकाली वृद्धत्व आले आहे. सध्याची स्थिती बघता मला माणसाची वयोमर्यादा हि ६० ते ६५ असावी असे वाटत आहे. निदान ही वयोमर्यादा कदाचित मनाची सुदृढ असण्याची असावी.



उत्तरार्ध का म्हणत असावे बरे ? आयुष्याच्या अत्यंत प्रभावी आणि सक्षम विचार शक्तीच्या वयात जे कैक प्रश्न मनात येतात ते शोधण्याची एक संधी देवांनी आपल्याला दिली आहे. पूर्वीचे अर्धे आयुष्य प्रश्नापोटी आणि उरलेले अर्धे आयुष्य उत्तरापोटी असे कालचक्र जणू देवाने घालूनच दिले आहे मानवाला. त्यामुळे माझे असे मत आहे उत्तरार्ध ज्या माणसाच्या आयुष्यात पहिला येतो ती त्याची अंतर्मुख होऊन सत्यासत्याची पडताळणी करण्याची सुरवात असते. कदाचित म्हणून उत्तरायण हे वर्षाच्या सुरवातीला येते. अध्यात्माच्या भाषेत याला 'मोक्ष' च्या अभ्यासक्रमाची सुरवात म्हणता येईल. जरा किचकट आहे पण सोपे होते प्रत्येकाला आज ना उद्या ज्याच्या त्याच्या बौद्धिक नि वैचारिक क्षमतेनुसार उत्तरार्ध सुरु झाल्यावर. म्हणूनच कदाचित पूजनीय ज्ञानेश्वर सारखे एक संत एवढ्या लहान वयात एवढे काही करू शकले. कारण त्यांना उत्तरार्धाची जाण फार लहान वयात आली होती. तुकारामांसारखे साहित्य निर्माण उत्तराधातच होऊ शकले. नि हे सगळे अजरामर होऊन झाले.



परवा देवानंदचे एक गाणे लागले होते, माझा हात रिमोट वर थांबला. t .v चालू असताना सुद्धा मी ते गाणे कानाने अनुभवले. अहाहा काय गोडवा होता त्या गाण्यात !!! कितीही ए आर रहमान येऊ देत, पण किशोर नि रफी ची गाणी चिरंतन आहेत. ए आर रहमान सारख्या एकमेकाद्वितीय माणसांची गाणी अमर होतात ती फक्त आठवणी मधून, पण किशोर/रफी यांची गाणी आज पण लावली जातात. आजच्या उत्कृष्ट गाण्याचे आयुष्य हे मला नाही वाटत २ वर्षाहून अधिक असेल. जी कथा गाण्याच्या तीच कथा साहित्याची ... मी आदरणीय पु.ल.देशपांडे यांचा निस्सीम भक्त. किती वर्ष घालवली तेच तेच विनोद ऐकून वा वाचून, अजून सुद्धा घालवतोय. कोल्ह्टकरांपासून ते पु.ल.देशपांडे पर्यंत अनेक दीग्गज आले नि लिहून गेले. मला नाही वाटत ते साहित्य चिरंतन राहिले किंवा राहील. मध्ये मी एका संकेतस्थळावर वाचले 'जगातील १०० प्रभावी व्यक्ती' ... त्यात दावूद पासून ते सचिन पर्यंत आहेत. अभिनेता सचिन चे गाणे आहे, 'ही दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा. किती आले किती गेले .........'. जोस पर्यंत आपण या असल्या क्षणिक गोष्टींवर लक्ष केंद्रित करू तोस पर्यंत आपण असमाधानी आणि वैफल्यग्रस्त असू हे निश्चित. अरे रामापासून शिवाजी महाराजापर्यंत, विष्णू पासून येशू, पैगंबर, बुद्ध, महावीरापर्यंत आणि गांधींपासून बिल गेट्स पर्यंत लोक असताना या नावांची यादी मला फारच तुच्छ वाटते. कुठे तरी मी वाचले आहे जगात फक्त १ च माणूस आहे कि ज्याला असा एकही देश नाही जो ओळखत नाही, तो म्हणजे Michael Jackson.



३ अवस्था असतात आयुष्याचा योगी, रोगी आणि भोगी. पूर्वार्ध साधारणतः आपला भोगी होण्यात अथवा असण्यात जातो. ज्यांना वेळीच जाग येते ते योगी होण्याचा एक छोटा प्रयत्न करतात आणि उरलेले रोगी होऊन देह सोडतात. आणि या वाढदिवसाच्या दिवशी मी नेमके हेच ठरवले आहे कि आता चिरंतन गोष्टींच्या शोधात गुंतवायचे मनाला. भगवद्गीता पासून ते अनेक गोष्टींचा विचार करायचा.
माझे पुढील आयुष्य म्हणजेच उत्तरार्ध जास्तीत जास्त सकारात्मक विचारात आणि आचारात जावे हीच ईश्वर चरणी इच्छा. माझ्या मनाची प्रगती म्हणजे मी पर-गती म्हणतो, जे परावलंबी आहे ती, तुमच्यावर सोपवतो. आज पर्यंतचा माझा प्रत्येक क्षण तुमच्या सारख्या मित्रांमुळे अत्यंत आनंदात गेला, या बद्दल


धन्यवाद.



आपला कृपाभिलाषी ,


विजय

2 comments:

  1. faar sundar vichar mandale aahet.

    ReplyDelete
  2. सर्वांनाच भविष्य सुखकारक अणि शेवट गोड व्हावा असे वाटते पण त्याप्रमाणे वाटचाल करणारे फारच थोड़े असतात. विजय, तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

    ReplyDelete