Wednesday, January 19, 2011

धावपळ कशासाठी ?

आज माझा वाढदिवस. खरे तर वाढदिवस हा शब्द मी फक्त शरीर पुरता मर्यादित ठेवल्या सारखा दिसतोय. तरी ते जाऊ देत, आज काही तरी लिहावयाची उर्मी मला आली आहे. निदान आज लोक मला सहन करतील हा आत्मविश्वास (फुकाचा) माझ्यामध्ये जागृत झाला आहे. सध्या नोकरी मध्ये पगारवाढीचा महिना सुरु असल्याने, किती वाढणार असा एक चेंडू सारखा डोक्यातील सपाट जागेवर टप्पे खात बसलाय. नेहमी खूप जन वाढदिवसाला निरनिराळे संकल्प करतात. मी आज मागे वळून बघतो तेव्हा लक्षात येते कि भरपूर धावपळ झाली आणि भरपूर पुढे करायची आहे. कोणी तरी म्हंटले आहे ज्या माणसाला कुठे थांबायचे ते कळते तो विवेकी. पण संसार असणाऱ्या माणसाला जर थांबणे कळले तर संसाराची आणि संचयाची गाडी पुढे कशी जाईल. त्यामुळे रज:प्रवृत्तीचा अंगीकार होतो.

लहानपणी मला विचारले तू मोठा झाल्यावर काय होणार - मी चटकन बोललो 'मी गोविंदा होणार'. मी त्याचा मोठा चाहता आहे. उत्तर जेवढ्या जोरात दिले तेवढ्याच जोरात अंगावर कुठे तरी आवाज झाल्यासारखे झाले नि डोळ्या समोर चांदणे चमकत होते ते पण भर दिवसा. तेव्हा मला कळले मध्यमवर्ग चंदेरी दुनिया का म्हणते ते. म्हणा आम्ही म्हणालो आणि तसेच घडले असे फक्त नकारात्मक विचारांचेच होते. अहो आता कुठे पास झालेला १० वीतला मुलगा साहित्य, काव्य, सिनेमा आणि मुली हा विषय सोडून सुतारकाम, वेल्डिंग, प्रयोग इत्यादी गोष्टी करायला लागला तर लोक म्हणतील अरे हा काय मनोरुग्ण आहे का ? तर मी त्याला उत्तर देईन - जन हो त्यालाच तर डिप्लोमा म्हणतात. सडलो अक्षरशः सडलो. अहो अट्टल हाडाचा कलाकार, हाड म्हणण्यापुरता पण उभे नाही करायचे तेव्हा. जश्या करकर वाजणाऱ्या चपला नको असताना कोणी तरी घालायला लावतो, जो घालायला लावतो त्याला वाटते कि वाह काय भेट दिली आहे. पण जो घालतो त्यालाच त्या चावत असतात. तो बिचारा सहन करत जातो. नंतर त्याचा पायाचा मूळ गुणधर्म बाजूला जातो नि पाय कोडगे होऊन जातात त्या भेट देणाऱ्या माणसासारखे.

डिप्लोमा संपला तेव्हा काय निव्वळ वय होते १८. पण आपल्याकडे एक भयंकर प्रथा आहे ती म्हणजे दाखला. दाखला देणे हे आजच्या पिढीच्या नकारात्मक बाजूचे सगळ्यात महत्वाचे कारण. ही काही वाक्य पदोपदी ऐकायला, पाहायला अथवा बोलताना आढळतात - अरे तो बघ नाही तर तू, अरे तिथे बघ नाही तर इथे, त्यापेक्षा तूच का नाही ?, हेच जर तू केले असतेस तर ? तुझे कष्ट त्याच्या पेक्षा थोडे, त्याला बघ किती मार्क ......... मार्क, पगार, प्रगती, पैसे, मैत्री .... कशा कशाचे म्हणून दाखले दिले जात नाहीत ते सांगा. मग काय बाजीराव, माधवराव, शिवाजी यांच्या बरोबर आम्ही, पण थोडे उशिरा, १८ वर्षी चाकरीस लागलो. नोकरीसारखे सगळ्यात भयानक वेळ काढू दुसरे काही नाही असा माझा दावा आहे. वय म्हणजे असे काही पटापट पुढे जाते कि काही विचारू नका. बाहेर छातीठोकपणे सांगतो कि एवढी वर्ष झाली मी काम करतो. तेवढी वर्ष झाली मी आता चीफ आहे ...... मग एक दिवस असाच कुठला तरी दिवस येतो नि आठवते असे अजून आपण काहीच साध्य केले नाही. याला थोड्या वरच्या भाषेत सांगायचे झाले तर स्वार्थ पूर्ण झाल्यावर परमार्थाची आठवण येणे असे म्हणतात. पण परमार्थ हा शब्द वाटतो तेवढा सोपा नाही. ही स्थिती म्हणजे पिण्यापेक्षा मेलेला बरे पण, मरण्याची भीती वाटते म्हणून पिलेल बरे. अशी आहे. पुन्हा नवीन ध्यास लागतो ... पगार वाढ झाली कि कार, घर, जागा, पर्यटन काही तरी एक ठरवायचे नि वेड्या सारखे मेहनत करून धावायचे त्या ध्यासापोटी. म्हणता म्हणता वर सरते, नवीन ध्यासाचा ध्यास घेण्याची वेळ येते नि पुन्हा पगार वाढीच प्रतीक्षा असते. तोस पर्यंत बरेच पाणी पुलाखालून गेलेले असते. जस जसा मनुष्याचा उत्तरार्ध जवळ येतो तोस पर्यंत हाती काय आहे व राहिले याची खंत करत बसायची सुरवात होते.

नोकरी आणि अभियांत्रिकी सी-सो सारखे सांभाळत झाले. आता प्रश्न होता सगळ्यात महत्वाच्या टप्प्याचा. कारण आता मिळणारी नोकरी हि स्थिर करणारी अपेक्षित होती. एक लक्षात ठेवा जेव्हा आपण म्हणतो अपेक्षित होती, तेव्हा ती दुसऱ्या कोणाची तरी अपेक्षा असते आपल्या कडून. पण आज काळाच्या IT जगतातील अनेक किटाणू जसे जगतात तसेच मी पण जगतोय. रागावू नका तुमच्यातील काही किटाणू IT प्रतीबंधाकातील चांगल्या किटाणू सारखे चांगले पण असतील. पण मी सांगू का हि महागाई, जागेचे भाव, गरिबांचे हाल याचा कुठे तरी दोष हा आपण स्वतः कडे घायला शिकले पाहिजे. त्या शिवाय एक चांगल्या कमावत्या वर्ग कडून समाजसेवा घडेल कशी ? कारण ज्याला अपराधाची भावना आहे तोच सुधारू शकतो. ज्याला वाटते समाजातील काही वाईट गोष्टी माझ्यामुळे आहेत, तरच तो ते भरून काढेन.

माझे सगळे घोडे इथे अडले आहे, मला जे हवे ते मी कधी करूच शकलो नाही. खरे सांगू का गोविंदा, एक छोटा इंजिनिअर, काही वर्षे IT च्या बाहेर असणारा नोकरदार माणूस हे सर्वे मला सुखावून जात होते. पण हवा तसा पाठींबा नाही मिळणे हि तर मध्यम वर्गातील एक श्वासनलिका असल्या सारखे असते असे मला वाटते. आता हे वरील विचार जरी मला किंवा तुम्हाला पटले तरी जसे वय वाढत जाते तसा हा पाठींबा नावाचा प्रश्न संदर्भासहित स्पष्ट सुटत जातो नि त्याच्यावर आपण काय करावे हे पण शिकवत जातो. हे बघा आताचे हे वय असे असते कि सगळे आपलेच बरोबर कारण ते आपल्या मनासारखे असते. आणि त्या नुसार आपण पटवून अनेकदा देतो. खरे तर देत नाही पण आपल्यातील तरुणपणा, उत्साह, तिखट-मीठ लावलेला अनुभव समोरच्याला काही वेळे पुरता भुरळ पाडतो. मग एकदा आचारसहिंता संपली कि परत आपण आपल्या मनासारखे करायला मोकळे. विचार कितीही प्रगल्भ असू देत मग ते गांधीजींचे, टिळकांचे, संस्कृतीचे व कोणाही आदरणीय व्यक्तीचे असले तरी जोस पर्यंत आपले मन ते मान्य करत नाही तोस पर्यंत हा सर्व खेळ व्यर्थ आहे. जसा मी मोठा होत गेलो तसे मला पटायला लागले आपले आई वडील १०० % बरोबर करत गेले कारण तेव्हा ते असलेल्या परिस्थितीत चुकणे म्हणजे स्वताहून हाल करण्या सारखे असावे. मध्यम वर्गाची चुकेचे रूपांतर भोगत होते. तर श्रीमंतांना तीच चूक संधी सारखे देऊन जाते. माझ्या या वाढदिवसाचा अभ्यास इथे संपतो नि मी साराकडे वळतो.

गरीब, श्रीमंत नि मध्यम हे जर तुम्ही अर्थ रुपी समजत असाल तर याला काहीच अर्थ नाही असे मानावे लागेल. या ३ मनाच्या स्थिती आहेत. मनाने खंबीर असणे म्हणजे श्रीमंत, माने चाचपडत पण सकारात्मक असणे म्हणजे मध्यम वर्ग तर नकारात्मक असणे म्हणजे गरीब होय. आपल्या आई वडिलांनी आपल्याला काय दिले जमीन, दुकान कि नोकरी ........ या पैकी काही नाही. त्यांनी दिली ती मनाची श्रीमंती. येणाऱ्या संकटकाळाशी लढत देण्याएवढा खंबीरपणा. असे अमूल्य दान आपल्या कडे असून सुद्धा आपण खंत करतो तुम्ही काय केले ? अरे जसा जन्माला आलास तसाच सोडला असतात तर काय झाले असते. सर्व भौतिक गोष्टी ज्याच्या त्याला मिळवता येतात आणि म्हणूनच त्याला भौतिक सुख म्हणतात. जे फक्त तोच आणि त्याच्या पुरतेच साधू शकतो ते भौतिक. पण हे संस्कार ते अमूल्य आहेत, अबाधित आहेत. ते आपल्या कडे आले तेच पुढे द्यायचे. संस्कार दिल्याने वाढतात कारण जे दिले जात नाहीत ते संस्कार नसतातच.

या अखेरच्या ओळींमध्ये माझ्या आई वडील, मित्र नि शत्रू यांचे आभार मानून पुन्हा पुन्हा वंदन करतो. कारण आज जर मी थोडा जरी कुठे तरी माणूस असेन तर १०० % योगदान त्यांचे आहे. कारण वाईट हा तर मूळ रंगच आहे. कारण जन्म मुळातच स्वार्थातून होतो. माझ्या वाढदिवशी मी असे ठरवतो आता धावपळ करायची ती चांगले संस्कार करण्यासाठी, जे चांगले आहे ते चांगले असेल तर त्या वर खंबीर राहून ते तडीस नेण्याच्या अपर इच्छाशक्ती साठी. अशी ही माझी धावपळ माझ्या अखेरच्या वेळेपर्यंत अविरत आणि अविश्रांत राहू देत हा आशीर्वाद मागातो नि ईश्वर चरणी 'सर्वे सन्तु सुखिनः ' प्रार्थना करतो.

वियोग